Friday, November 23, 2012

सद् शिष्य कसा असावा ?


सद् शिष्य कसा असावा ?

सद्गुरु ची लक्षणे सांगून झाल्यावर समर्थ सद् शिष्याची लक्षणे सांगतात .परमार्थात सद्गुरु व सद् शिष्य यांची सांगड होणे महत्वाचे असते कारण -

सद्गुरुविण सद् शिष्य । ते वाया जाय निशेष । का सद् शिष्येविण विशेष । सद्गुरु शिणे। । ५ -३ -२ । ।

सद् शिष्याला सद्गुरु भेटला नाही तर तो पूर्ण वाया जातो .तसेच सद्गुरुला सद् शिष्य भेटला नाही तर सद्गुरुला श्रम होतात .ही गोष्ष्ट स्पष्ट करण्यासाठी ते भूमीचा दृष्टांत देतात .भूमी उत्तम आहे ,पण बी किडके आहे तर पीक येत नाही ,किंवा बी उत्तम आहे पण जमीन खडकाळ आहे तरी पीक येत नाही .सद् शिष्य ही उत्तम भूमी ,तर सद्गुरु उत्तम बी सारखा .शिष्य अनाधिकारी ,अपात्र असेल तर सद्गुरुला फुकट श्रम होतात .जेव्हा सद्गुरु व सद् शिष्य एकत्र येतात तेव्हा सद्गुरूंना वाटत की हाच तो ज्याची मी वाट पाहातहोतो .रामकृष्ण परमहंसांना विवेकानंदांना पाहून असच वाटल,श्री समर्थांना कल्याण स्वामींना पाहून असेच वाटले सद्गुरु ,सद् शिष्य आहेत पण अध्यात्म निरूपण नसेल उपयोग होत नाही ,जसे पीक तयार होउन आले तरी त्याची निगा राखावी लागते .त्याप्रमाणे आत्मज्ञान झाले तरी साधन चालू ठेवावे लागते .कारण साधन नसेल तर अविद्येचा अंमल होतो .
म्हणौन साधन अभ्यास आणि सद्गुरु । सद् शिष्य आणि सद्शास्त्र विचारू ।
सत्कर्म सद्वासना पारू । पाववी भवाचा । । समर्थ म्हणतात ,'साधन ,अभ्यास ,सद्गुरु ,सद् शिष्य ,सद्शास्त्र विचार सत्कर्म सद्वासना या सर्व गोष्टी एकत्र असतील तरच भवसागर पार करून जाता येइल .
आता समर्थ सद् शिष्याचे लक्षण सांगत आहेत ,

मुख्य सद् शिष्याचे लक्षण । सद्गुरुवचनी विश्वास पूर्ण । अनन्य भावे शरण । या नाव सद् शिष्य । । ५ -३ -१९ । ।
सद्गुरु वचनावर पूर्ण विश्वास ,व सद्गुरुला अनन्य भावे शरण जाणे ही सद् शिष्याची लक्षणे आहेत .कल्याण स्वामी सारखे शिष्य सद्गुरुंच्या केवळ 'कल्याणा छाटी उडाली 'या शब्दाखातर उंच कड्यावरून छाटी पकडण्यासाठी उडी घेतो तेव्हा तो जीवाचा विचार करत नाही ,सद्गुरूंनी सांगितले ते करायचे एव्हडेच त्याला माहीत !

सद् शिष्य कसा असावा ?

शिष्य निर्मल अंत :करणाचा ,आचारशील-आचाराने शुद्ध ,शुद्ध चारित्र्याचा ,विरक्त-हवे नको पण संपलेला , अनुतापी-झालेल्या चुकांबद्दल पश्चाताप वाटून त्या चुका पुन्हा न करणारा ,निष्ठावंत-सद्गुरु वचनावर पूर्ण विश्वास ठेवणारा ,सुचिश्मंत -ज्याची मती म्हणजे बुध्दी अतिशय शुद्ध आहे असा ,नेमस्त -नित्य नेम पाळणारा,साक्षपी -प्रयत्न करणारा ,परम दक्ष-अतिशय सावध ,अलक्षी लक्षी -अतींद्रिय वस्तूवर लक्ष केंद्रित करण्याचे मनोबल असणारा ,परोपकारी-दुस-याला मदत करणारा ,निर्मत्सरी-कोणाचाही मत्सर ,द्वेष न करणारा ,अर्थांतरी प्रवेशकर्ता -ग्रंथाचा अभ्यास करताना शब्दार्थाच्या अंतरंगात शिरणारा ,नीतिवंत -चांगल्या वाईटाचा विचार करणारा ,युक्तिमंत -हिकमती ,बुध्दीमंत -बुध्दीमान् ,सद्विद्येचा -उत्तम लक्षणांचा ,निर्लोभी ,निराभिमानी ,अनासक्त अशा गुणानी युक्त असावा .
सद् शिष्य कसा नसावा ?अविवेकी नसावा ,गर्भश्रीमंत नसावा ,अविश्वासी नसावा .कारण -

अविश्वासे कास सोडिली । ऐसी बहुतेक भवी बुडाली । नाना जळचरे तोडिली । मध्येच सुख दु:खे । । ५ -३ -३७ । ।

या कारणे दृढ़ विश्वास । तोचि जाणावा सद् शिष्य ।मोक्षाधिकारी विशेष । आग्रगण्यु। । ५ -३ -३८ । ।
 

Wednesday, November 7, 2012

आत्यंतिक गुरु-श्रद्धा कशी असावी ?

काल प. पू. बाबा बेलसरे ह्यांचे ज्ञानेश्वरी वरील प्रवचने ऐकत होते. नेहमीप्रमाणे बाबांना श्री महाराजांविषयी असलेले आत्यंतिक प्रेम ह्यातूनही व्यक्त होते जागोजागी. त्यात एके ठिकाणाची एक आठवण नमूद करून ठेवावी अशी आहे. भाऊसाहेब केतकरांना बेलसरे बाबा खूप मानीत. त्यांच्यासारखा प्रपंचात राहून परमार्थ साधणारा विरळा असा त्यांचा उल्लेख आपण महाराजांच्या चरित्रात वाचतो. त्यांच्या गुरु-भक्ती अतिशय हृदयपूर्ण आठवण बेलसरे ह्या व्हिडीओ मध्ये सांगतात.

गुरु-प्रेम आणि गुरु-निष्ठा कशी असावी?

भाऊसाहेबांना महाराजांना रामनामाची दीक्षा द्यायची होती. त्यांनी विचारले त्यांना- तुम्ही आधी कुणाकडून दीक्षा घेतली आहे का? मागे एकदा कुण्या एका गुरु कडून ते त्यांच्या घरी आले असताना भाऊ साहेबांनी मंत्र घेतला होता. ते त्यांनी महाराजांना सांगितले. महाराज त्यांना म्हणाले, काही हरकत नाही. तुम्ही त्यांच्याकडे पुन्हा जा आणि त्यांना आपला मंत्र परत घ्यायला सांगा. इतर कुणी असते तर त्यांनी शंभरदा विचार केला असता, काय करावे आता; असे कसे जावे आणि तुमचा मंत्र परत घ्या म्हणून सांगावे. परंतु भाऊ साहेबांची महाराजांवरची निष्ठा अशी दांडगी, त्यांनी काहीच विचार केला नाही. तडक गेले आणि त्या गुरूंचा यथोचित आदर करून त्यांना सांगितले कि तुमचा मंत्र परत घ्या; मला महाराजांकडून मंत्र घ्यायचा आहे. त्या गुरूंनीही काहीच न बोलता आपला मंत्र मागे घेतला आणि भाऊ साहेबांना मोकळे केले. काय विलक्षण नाते होते भाऊ साहेबांचे आणि महाराजांचे! महाराजांनी सांगितले म्हटल्यावर संपले. ते कधीच पुन्हा असे का म्हणून विचारात नसत.

त्यांचे वैराग्य इतके प्रबळ होते, की प्रत्येक  छोटी छोटी गोष्ट ते महाराजांच्या कानावर घालीत आणि मोकळे होत. म्हणत असत- आता माझा संबंध संपला त्या गोष्टीशी. घेतील महाराज बघून.

आपण नुसते राम-करता-करविता म्हणतो, पण त्या प्रमाणे वागत नाही. त्यामुळे आपण कायम डोक्यावर ओझे वाहतो. जो पर्यंत भाऊ साहेबांसारखी आपली भावना शुद्ध होत नाही तोवर आपण परमार्थ काहीच साधला नाही म्हणावे लागेल. गुरु-आज्ञा प्रमाण हे जोवर हृदयात खोलवर मुरत नाही तोवर खूप तळमळ वाटली पाहिजे. परंतु गुरूंच्या इच्छेने एक मात्र होते ते म्हणजे आपण नामाला लागतो. आणि जसे महाराज म्हणतात- तुम्ही फक्त नाम घ्या; ते विवेक आणि वैराग्य मी बघून घेतो, ते हळू हळू पटायला लागते.

अजून काय सांगायचे गुरूंनी? 

Friday, November 2, 2012

श्री राम


||श्री राम||

तुम्ही मानले मला आपुले शिष्य |
दिलात जणू पुनर्जन्म ||
कधीच न फिटे आपुले ऋण |
तारेल मला सदैव आपुले नाम ||१||

श्री महाराज श्री महाराज हाकारे मन माझे |
मानसपूजेमध्ये सदा लीन व्हावे वाटे ||
अखंड रामनाम दिलेत तुम्ही ताराया |
करू दे भक्ती तुमची हा वर द्यावा कृपया ||२||

असंख्यात भक्तजन जपती रामनाम |
मज पामराचा तिथे काय भला पाड ||
तरीही कृपा मजवरी झाली अपरंपार |
या कृपेला करुणानिधे करी मज सत्पात्र ||३||

निडारले नयन श्रींची करुणमूर्ती न्याहाळता |
गुरुचरणी अखंड असो नमिलेला माझा माथा ||
सद्गुरू-शिष्य नाते हे जन्म-जन्मांतरीचे |
भक्तीत बुडून जावे, नामसागरात फैलावे वाटे ||४||

विवेक आणि वैराग्य दोनही सहज घडती |
सद्गुरूंचे रामनाम सदा देतसे प्रचीती ||
प्रपंची राहोन परमार्थ करावा वचन असे नेमस्त |
महाराजांची दास मी केली प्रतिज्ञा हृदयस्थ ||५||

|| श्री राम जय राम जय जय राम ||