Thursday, January 17, 2013

पू. बाबा बेलसरे अध्यात्म संवाद वाचताना टिपलेले काही मुद्दे —



पू. बाबा बेलसरे अध्यात्म संवादातून पुन्हा पुन्हा वाचावे असे— 

१. सर्व वेळ इतके नाम घ्यावे की दुस-या वृत्तीच उठणार नाहीत.
२. नामाचे प्रेम येण्यास नाथ-भागवत हा उत्तम ग्रंथ आहे.
३. वास्तविक अनुग्रह घेतला की सर्व काही गुरूवर सोपवून देता आले पाहिजे. व्यवहारात आपल्याला तशी सवय आहे. ऑर्डर निघाली की लगेच आपण साहेब होतो. माळ घातली की लगेच नवरा किंवा बायको होतो. मग येथेच घोडे कोठे अडते?
४. बाकीची कामे करून रोज ५-६ तास उपासना करेन असा निश्चय करा.
५. पू. बाबांची पुस्तके- १) अंतर्यात्रा २) प्रेमयोग
६. जीवनात कमी जास्ती व्हायचेच. पण आपण मन क्षुद्र होऊ देता कामा नये. दुसरा क्षुद्रपणे वागला तरी आपण विशाल झाले पाहिजे, कारण क्षुद्रपणा साधनाच्या आड येतो आणि आपण एकदम खाली घसरतो.
७. नाम घेताना आपण काहीतरी मौल्यवान वस्तू सांभाळत ओत असे वाटले पाहिजे. तुलसीदासांनी नामाला राम-रतन आणि सद्गुरूंनी कृपा करून दिलेली अमूल्य वस्तू म्हटले आहे.
८. श्री महाराज म्हणत, नामस्मरण करतो ह्याचा अर्थ कुंडलिनी जागृत झालेली असलीच पाहिजे.
९. आपल्या गुरूंना ३ गोष्टी आवडतात- १) अखंड नामस्मरण २) अन्नदान आणि ३) सगुणाचे प्रेम
१०. खरा भक्त द्वैतातील सुख भोगतो- तू देव मी भक्त ऐसे करी असे म्हणतो.
११. श्री महाराजांनी विषयाची खूप सोपी व्याख्या केली आहे- भगवंता-खेरीज जे जे आहे ते सर्व विषय.
१२. दुस-या संतांच्या दर्शनाला जाणे काही गैर नाही. परंतु ते आपल्याला काहीतरी देतील (पारमार्थिक मदत) अशी अपेक्षा बाळगणे हे चूक आहे. पारमार्थिक मदत फक्त श्रीमहाराजांकडेच मागावी. हाच अनन्यभाव.
१३. श्री महाराज म्हणत, मी कोणाचे अंतःकरण कधी दुखावले नाही. ह्याचाच अर्थ ते सर्वव्यापी होते. दुस-याच्या अंतःकरणात मीच आहे अशी जाणीव झाली की त्याचे अंतःकरण कसे दुखवणार? सर्वांभूती भगवद्भाव  ही श्रेष्ठ अवस्था आहे.
१४. श्रीमहाराज म्हणत, पैसा नसला तर अडते आणि असला तर नडते; म्हणून पैशाची विवंचना बाजूला ठेवून नाम घेतले पाहिजे.
१५. आपले बोलणे वागणे सर्व काही असे असावे की आपली गोड स्मृती रहावी. एकदा मनात विचार आला, श्रीमहाराजांची आठवण इतकी वरचेवर का होते? तेव्हा आढळून आले की त्यांच्या संदर्भात फक्त गोड स्मृतीच आहेत.
१६. श्री महाराजांचे म्हणणे असे की दान दिल्याने आपले कमी होत नाही. आपल्या प्रारब्धात असेल तितके आपल्याला मिळतेच.
१७. जर नाम सर्वव्यापी आहे आणि म्हणून आपले जीवनही त्यातच आहे, तर त्याचा प्रत्यय का येत नाही? अविद्या हे ह्याचे कारण आहे असे वेदांत सांगतो. तथापि हे स्पष्ट करणारी श्रीरामकृष्णांची सांगितलेली गोष्ट चांगली आहे. एका माशाच्या पिल्लाने त्याच्या आईला विचारले की समुद्र समुद्र म्हणतात तो कोठे आहे? त्याची आई म्हणाली, बाळा, तू समुद्रात जन्मलास, तेथेच राहतोस आणि समुद्रातच मरणार. त्या आईसारखे सद्गुरू असतात. ते आपल्याला नामाची ओळख करून देतात.
१८. लोकांकडून मिळणारा मान हा मधुमेहाच्या रोग्याच्या रक्तातील साखरेसारखा असतो. वरवर त्याचे काही वाटणार नाही; पण तो साधनी माणसाचा घात केल्याशिवाय राहणार नाही.
१९. प्र-प्रथम कर्तव्य- सर्वांभूती-भगवद्भाव
२०. मी केवळ सद्गुरू आणि देवाच्या हातातील एक बाहुली आहे. ते जसे सांगतील तसे मी वागावे; त्यातच माझे कल्याण आहे. स्व पूर्णपणे त्यागावा.
२१. आहे तितुके देवाचे | ऐसे वर्तणे निश्चयाचे |
   मूळ तुटे उद्वेगाचे | येणे रीती ||
२२. नाम घेताना काळाचे भान सुटले पाहिजे.
२३. योगामार्गापेक्षा भक्तिमार्गात सिद्धींचे वेगवेगळे टप्पे केव्हा येऊन गेले याचा साधकाला पत्ताच लागत नाही. त्यामुळे साधक घसरण्याची भीती कमी असते.
२४. How to find Guru- by Chapman - a book
२५. कान्हनगड च्या स्वामी रामदासांचे पुस्तक- In quest of God, In the Vision of God, and World of God
२६. योगी श्री कृष्णप्रेम ह्यांच्या बद्दल वाचणे
२७. मुखात नाम असणे हे हाती भगवंत असण्यासाराखेच आहे; परंतु म्हणूनच अखंड नामस्मरण अवघड आहे.
२८. दृश्य सुटल्याखेरीज भगवंताचे दर्शन नाही. एक वेळ अशी येते कि दृश्य सुटलेले असते आणि भगवंताचे दर्शन झालेले नसते. त्या वेळी जीवास फार भीती वाटते.
२९. Brother Laurence has told 3 steps to improvement - 1) Recollection- स्मरण 2) Conversation- संभाषण – सुरुवातीला हे एकतर्फी असते. तुम्ही ईश्वराशी बोलता; तो बोलेलच असे नाही. 3) Sustained awareness- अनुसंधान
३०. कृष्णमूर्ती जेव्हा burden of the past म्हणतात, तेव्हा माणसे ओळखणे, नावे लक्षात ठेवणे यासारख्या पूर्वस्मृती नाहीशा करायला ते सांगत नाहीत, तर त्यातून जे भावविश्व मी रचलेले असते ते नाहीसे करायला सांगतात.
३१. उपनिषदांत म्हटले आहे- द्वितीयात् भयं | म्हणजे जो पर्यंत मी वेगळा आणि बाकीचे जग वेगळे आहे तोपर्यंत जगापासून भीती राहणारच.
३२. जीवनातील आसक्ती, वखवख कमी होऊ लागली तर अध्यात्मिक शक्ती वाढते आहे असे मानायला हरकत नाही.
३३. निर्वैर व्हावे सर्व भूतांसवे | साधन बरवे हेची एक || असे तुकाराम महाराज म्हणतात. 

1 comment:

  1. अगदी खरय हे... अम्हाला आठव दिल्याबद्दल आपले आभार!

    ReplyDelete