Tuesday, July 16, 2013

प. पू. बाबा बेलसरे उवाच २

महाराज म्हणत, एक माणूस गिरणीच्या यंत्रशाळेत गेला. तिथे त्याचे उपरणे एका चाकात अडकले तर हा हा म्हणता तो सर्वच त्यात ओढला गेला. तसे माणूस भगवंताचे नाम घेऊ लागल्यावर तो 'पोहोचतोच' यात शंका नाही. त्याची जी खेच असते त्याला 'अभिक्रम' म्हणतात. भगवंताचे नाम घेतलेले कधीही वाया जात नाही. आपली आतली घाण जेवढी असते ती नाहीशी करण्यास लागणारा प्रयत्न आपला होत नाही म्हणून आपली प्रगती दिसत नाही. पण जसे योगी अरविंद म्हणतात, "You must have intense aspiration but with great patience." या Patience चा अर्थ असा की मला मनाची शांतता पाहिजे यात शंका नाही पण ती तुझ्या इच्छेप्रमाणे, तुला हवे तेव्हा मला दे. नाम घेतले की थोडक्या काळात साधू होईल असे कठीण आहे. "कहत कबीर सुन मेरे गुणिया | साहेब मिले, सबूरीमें |"

~~ प.पू. बाबा बेलसरे

प. पू. बाबा बेलसरे उवाच !

भगवंताचे दर्शन हे सर्वोत्तम मानवी ध्येय आहे. ते साध्य होण्यास तपश्चर्या करावी लागते. पण ही तपश्चर्या म्हणजे स्नान, दान, वेदाध्ययन, शास्त्राभ्यास, योग, याग, व्रतवैकल्ये, अनुष्ठान, तीर्थाटन किंवा उपासतापासाने शरीरशोषण नव्हे. अध्यात्मामधील तपश्चर्या म्हणजे नीतिधर्माचे आचरण, पवित्र अंतःकरण आणि भगवंताचे अखंड स्मरण हे होय. आपली शक्ती ह्यासाठी कमी पडते म्हणून श्रीसद्गुरूंची मदत मागावी लागते. ती मदत मागताना तिची किंमत द्यावी लागते. ती किंमत म्हणजे "त्याग"- वासनांचा त्याग, विकारांचा त्याग, आसक्तीचा त्याग, ममत्त्वाचा त्याग, कर्मफलाचा त्याग, देहबुद्धीचा त्याग आणि उपाधींचा त्याग. पण ह्या सर्व त्यागाचे मर्म एकाच त्यागामध्ये सापडते. तो त्याग म्हणजे कर्तेपणाच्या अभिमानाचा त्याग होय. 

~~ प.पू. बाबा बेलसरे

नामस्मरण ते श्रेष्ठ!

ध्यानपूर्वक केलेल्या नामस्मरणामुळे सदैव परमेश्वराचे सान्निध्य प्राप्त होते. आपला हा विश्वास व्यक्त करताना संतश्रेष्ठ श्री नामदेव महाराज परमेश्वराला म्हणतात -

"लपलासी तरी नाम कोठे नेसी |
आम्ही अहर्निशी नाम गाऊ ||
आम्हापासुनिया जाता न ये तुज |
ते हे वर्मबीज नाम घोकू ||
आम्हासि तो तुझे नामचि पाहिजे |
मग भेटी सहज देणे लागे ||
भोळी भक्ते आम्ही चुकलो होतो वर्म |
सापडले नाम नामावली ||"
सीता मंदोदरीला सांगते आहे- 

सावध ऐक साजणी |
प्रवेशता रामानुसंधानी ||
चित्त चित्तपणा विसरूनी |
राम होऊनी स्वये राहे ||


शबरी आपली अवस्था वर्णन करते--

आसनी शयनी आम्हा आणिक बोधु |
एकाजनार्दनी गोड लाविला वेधु ||
जागृती जे जे दिसे |
ते ते राम असे ||
स्वप्नी जे आभासे |
तेही रामु ||
सुषुप्तीचे सुख केवळ राम देख |
रामाविण आणिक नाही नाही ||