काल प. पू. बाबा बेलसरे ह्यांचे ज्ञानेश्वरी वरील प्रवचने ऐकत होते.
नेहमीप्रमाणे बाबांना श्री महाराजांविषयी असलेले आत्यंतिक प्रेम ह्यातूनही व्यक्त
होते जागोजागी. त्यात एके ठिकाणाची एक आठवण नमूद करून ठेवावी अशी आहे. भाऊसाहेब
केतकरांना बेलसरे बाबा खूप मानीत. त्यांच्यासारखा प्रपंचात राहून परमार्थ साधणारा
विरळा असा त्यांचा उल्लेख आपण महाराजांच्या चरित्रात वाचतो. त्यांच्या गुरु-भक्ती
अतिशय हृदयपूर्ण आठवण बेलसरे ह्या व्हिडीओ मध्ये सांगतात.
गुरु-प्रेम आणि गुरु-निष्ठा कशी असावी?
भाऊसाहेबांना महाराजांना रामनामाची दीक्षा द्यायची होती. त्यांनी विचारले
त्यांना- तुम्ही आधी कुणाकडून दीक्षा घेतली आहे का? मागे एकदा कुण्या एका गुरु कडून
ते त्यांच्या घरी आले असताना भाऊ साहेबांनी मंत्र घेतला होता. ते त्यांनी
महाराजांना सांगितले. महाराज त्यांना म्हणाले, काही हरकत नाही. तुम्ही
त्यांच्याकडे पुन्हा जा आणि त्यांना आपला मंत्र परत घ्यायला सांगा. इतर कुणी असते
तर त्यांनी शंभरदा विचार केला असता, काय करावे आता; असे कसे जावे आणि तुमचा मंत्र
परत घ्या म्हणून सांगावे. परंतु भाऊ साहेबांची महाराजांवरची निष्ठा अशी दांडगी,
त्यांनी काहीच विचार केला नाही. तडक गेले आणि त्या गुरूंचा यथोचित आदर करून त्यांना
सांगितले कि तुमचा मंत्र परत घ्या; मला महाराजांकडून मंत्र घ्यायचा आहे. त्या
गुरूंनीही काहीच न बोलता आपला मंत्र मागे घेतला आणि भाऊ साहेबांना मोकळे केले. काय
विलक्षण नाते होते भाऊ साहेबांचे आणि महाराजांचे! महाराजांनी सांगितले म्हटल्यावर
संपले. ते कधीच पुन्हा असे का म्हणून विचारात नसत.
त्यांचे वैराग्य इतके प्रबळ होते, की प्रत्येक छोटी छोटी गोष्ट ते महाराजांच्या कानावर घालीत
आणि मोकळे होत. म्हणत असत- आता माझा संबंध संपला त्या गोष्टीशी. घेतील महाराज
बघून.
आपण नुसते राम-करता-करविता म्हणतो, पण त्या प्रमाणे वागत नाही. त्यामुळे आपण कायम
डोक्यावर ओझे वाहतो. जो पर्यंत भाऊ साहेबांसारखी आपली भावना शुद्ध होत नाही तोवर
आपण परमार्थ काहीच साधला नाही म्हणावे लागेल. गुरु-आज्ञा प्रमाण हे जोवर हृदयात
खोलवर मुरत नाही तोवर खूप तळमळ वाटली पाहिजे. परंतु गुरूंच्या इच्छेने एक मात्र
होते ते म्हणजे आपण नामाला लागतो. आणि जसे महाराज म्हणतात- तुम्ही फक्त नाम घ्या;
ते विवेक आणि वैराग्य मी बघून घेतो, ते हळू हळू पटायला लागते.
अजून काय सांगायचे गुरूंनी?
No comments:
Post a Comment